Sunday, November 23, 2008

प्रतीकात्मकता

( काय भारदस्त title जमले आहे!)     


हल्लीच 'वाटेवरले सोबती' हे विजय पाडळकरांचे पुस्तक वाचले. वाचता वाचता मनात कायमच्या घर करुन राहिलेल्या व्यक्तींविषयी आहे. व्यक्तिरेखा म्हणत नाही, कारण या व्यक्ती मनात राह्तात त्या निव्वळ लेखकाने निर्माण केलेले पात्र म्हणून नव्हे, तर खरोखरच भेट झालेल्या जिवंत माणसांसारख्या. कोरडी समीक्षा नाही किंवा अगदी बाळबोध 'हे असे असे घडते' छाप गोषवाराही दिलेला नाही. कलाकृतीशी ओळख होईल आणि प्रत्यक्ष वाचण्याची इच्छा होईल अशा प्रकारे लिहिले आहे.
पण एकंदरीतच पुस्तकांविषयी लिहिताना लोकांना त्यामागची प्रतीके शोधाविशी का वाटतात, कळत नाही. कित्येकदा, खुद्द लेखकाच्या मनात नेहमी 'मला अमुक एक गोष्ट मांडायची आहे. त्याचे प्रतीक म्हणून मी आता हे असे-असे लिहितो' असली भावना असेल, हे पटत नाही. कारण, जे काही सांगायचे आहे, ते सरळ सांगायला कसली आडकाठी आहे? आणि सामान्य वाचक- म्हणजे आमच्यासारखे :)- किती वेळा हे याचे प्रतीक आहे बरे का, असला विचार करतात? की मग कोणतीही कलाकृती महान ठरवायची असेल, तर तिने काहीतरी प्रतीकात्मकरित्या सांगितलेले असलेच पाहिजे असा नियम आहे की काय्, असेही वाटून जाते.
बरेचदा मात्र काहीतरी संदेश द्यायचा म्हणून केलेले लिखाण  इतके सुरेख उतरते, की पुढे काळ बदलला, त्या समस्यांना फारसा अर्थ राहीला नाही, तरी ते पुन्हा पुन्हा वाचले जाते. याचे एक उदाहरण म्हणून 'वायफळाचा मळा' हे चिं. वि. जोशींचे पुस्तक सांगता येईल. त्याची प्रस्तावना वाचली, की त्या कथा कोणत्या उद्देशाने लिहिल्या होत्या याची कल्पना येते. आज त्यातील बरेच problem अप्रस्तुत असले, तरी ते पुस्तक तितकेच अफलातून वाटते. म्हणजे, प्रतीके अल्पजीवी ठरली, पण ती मांडणार-या गोष्टी evergreen.
मला ईसापनीतीच्या गोष्टीदेखील वाचायला आवडत,आवडतात.  त्यांचे तात्पर्य  कधीच सांगता आलेले नाही. गोष्टीच्या खाली लिहिलेले असेल, ते गोष्टीचे तात्पर्य!
 

चित्रपटांच्या बाबतीत हे आणखीनच complex होते. आणि याचे एक मुख्य कारण blogs वर लिहिली जाणारी 'आस्वादक समीक्षा' हेही कदाचित आहे :)
     
तात्पर्य़ : बोंबला, हे हवेच आहे का?